Tuesday, 22 May 2018

"कृश नको क्रिश बनायचंय......"


          वैद्यकीय व्यवसाय करत असताना रुग्णांकडून बरेच गमतीशीर अनुभव ऐकायला मिळतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करून कंटाळलेले असतात तर काही लोक वजन वाढावं म्हणून मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून वेगवेगळ्या मजेशीर टिप्स घेत असतात. मागे एकदा माझ्या कडे आलेला एक रुग्ण मला गमतीने म्हणाला होता की "कृश नको क्रिश बनायचंय......" काही तरी उपाय सांगा त्यासाठी. माझ्या कडे येणाऱ्या रुग्णांत आणि माझ्यात अशा बऱ्याच गमती जमती नेहमीच सुरू असतात. त्यामुळे रुग्ण ही रिलॅक्स होतात आणि मी ही...... निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी मानसिकरित्या रिलॅक्स राहणं जास्त महत्वाचं आहे. लोकांमध्ये हाही एक मोठा गैरसमज आहे की, खूप खाल्ल की वजन वाढत आणि उपवास केला की वजन कमी होत. खुप खावून किंवा उपवास करून वजन वाढवता किंवा कमी करता येत नसत तर हे आपल्या शरीरातल्या पचन क्रिया आणि चयापचय क्रियेवर अवलंबून असत. उलट उपवास केल्याने जठराला विश्रांती मिळते आणि पचन क्रिया आणि चयापचय क्रिया उत्तम राहण्यास मदत होते परिणामी आहार वाढतो आणि वजन ही वाढू शकत. अति वाढलेलं वजन आणि अति प्रमाणात कमी असलेलं वजन दोन्ही आपल्या आरोग्यासाठी घातकच आहे. जे आपल्या कमी वजनामुळे आणि वाळलेल्या शरीरयष्टीमुळे स्वतःच्या मना मध्ये न्यूनगंड बाळगून आहेत अशा लोकांसाठी आज काही अगदी सोप्या घरगुती टिप्स आणि पथ्ये मी सांगणार आहे की ज्या पाळल्यानंतर त्यांचे वजन वाढण्यास मदत होईल. वजन वाढणे म्हणजे नुसतं पोट वाढणे नव्हे आणि नुसतं पोट वाढणे म्हणजे वजन वाढणे नव्हे. आणि हे लक्षात घ्या वाढलेलं पोट हे आजाराच माहेर घर असतं. फक्त पोट न वाढता संपूर्ण शरीराचं समतोलीत वजन वाढलं पाहिजे.

वजन वाढवण्यासाठी १० अगदी सोप्या टिप्स आणि पथ्ये

१. तेलाभ्यंग – आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने मालिश करून घ्यावी.

२. व्यायाम नियमित करावा. रोज सूर्यनमस्कार घालावा आणि रोज एक सूर्यनमस्कार वाढवत जावे.

३. व्यायामानंतर मुठभर कच्चे शेंगदाणे आणि गुळ खावा.

४. दोन्ही जेवणाच्या आधी अर्धा तास आल्याचा छोटासा तुकडा मीठ लावून चावून खावा.

५. आहार गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट असा षडरसात्मक असावा. त्यात गोड पदार्थ जास्त खावेत.

६. रात्री ८ तास निवांत आणि शांत झोप घ्यावी. दुपारी १५ ते २० मिनिटे झोप घ्यावी. कारण दुपारच्या झोपीमुळे शरीरातील ऊर्जा कमी खर्च होऊन वजन वाढण्यास मदत होईल. 

७. कॅलरीजयुक्त अन्न (ड्रायफ्रुटसबदाममनुका) रोजखावे आणि प्रोटीनयुक्त अन्न (मासे, अंडीमोड आलेले चणेचिकनभातदूध आणि दुधाचे पदार्थमेवा) पदार्थांचे आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.

८. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारात पनीरलोणी तसेच तूपाचा समावेश करावा.

९. जेवताना कच्च्या हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. त्यामुळे तुमचे आरोग्यही सुधारते आणि विनातणाव तुम्ही वजन वाढवू शकता. 

आणि सर्वात महत्वाचं पथ्य

१०. तणावमुक्त रहा, भरपूर हसा आणि आनंदी रहा.

टीप - वरील पथ्य पाळताना आपल्या प्रकृतीनुसार योग्य/अयोग्य गोष्टीचा सल्ला आपल्या डॉक्टरांकडून घ्यावा. पुढच्या लेखात मी वजन कमी करण्यासाठी उपाययोजना सांगणार आहे.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.