माझ्या मागील लेखात आपण बहुगुणकारी जवस बद्दल माहिती वाचलीत. आज मी तुम्हाला मुळव्याध या त्रासदायक आजारातील काही महत्वाची पथ्य सांगणार आहे. जे तुम्ही सहजरित्या घरी करू शकता. माझ्या हॉस्पिटल मध्ये मुळव्याध या आजारासाठी मी स्वतः एक आयुर्वेदीक औषध तयार केलं आहे. ज्याचा वापर केला तर कोणत्याही शस्त्रक्रियेविना “मुळव्याधापासून कायमची सुटका” होऊ शकते. त्यासोबत प्रकृतीनुसार योग्य पथ्य पाळली तर या आजारातून लवकर मुक्त होता येत.
मित्रांनो, हा आजार असा आहे की कोणी कोणाला सांगूही शकत नाही आणि लपवू ही शकत नाही. यात होणाऱ्या वेदना असह्य असतात. काहींना तर बसायला सुद्धा त्रास होतो. खरतर या आजाराच मुख्य आणि एकमेव कारण हेच आहे की आपण आपल्या प्रकृतीनुसार दिनचर्या अजिबात पाळत नाही. आपले खाणे, पिणे, फिरणे, झोपणे, व्यायाम हे सर्व प्रकृतीनुसार असायला हवे. पण तसे न करता आपण आपली दिनचर्या विकृत करून टाकली आहे. त्याच्या परिणामी आज बऱ्याच जणांना मुळव्याधीचा त्रास उदभवतो आहे. या त्रासामुळे पचन क्रिया आणखी बिघडून आपल्या शरीरातील महत्वाची अशी चयापचय क्रिया मंदावते आणि वेगवेगळ्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागतो. आपण वेळेत सावध झालो तर पुढच्या होणाऱ्या त्रासापासून लांब राहू शकतो. आज काल मूळव्याधासाठी एक म्हण प्रचलित झाली आहे...... जिभेचे चोचले, बुडाला टोचले...... विनोदाचा भाग सोडला तर आपण खरच जिभेचे अति लाड करत आहोत म्हणूनच मुळव्याधासारखा आजार आपल्या शरीरात घर करतोय. याला बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम तुमचा आहार, विहार किती आणि कसा असावा हे तुमच्या डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन योग्य दिनचर्या तयार करा. तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या वयानुसार आणि प्रकृतीनुसार योग्य ते मार्गदर्शन करतील. आणि तुमच्या प्रकृतीनुसार जी पथ्य आहेत ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय अजिबात करू नका. आज काल whatsapp, facebook सारख्या social media वर काही आजारांविषयी पथ्य, आयुर्वेदिक औषधे याच्या पोस्ट असतात. पण याचा अंधपणे वापर करणं अतिशय चुकीचं आहे, कारण ही पथ्य किंवा उपचार तुमच्या प्रकृतीनुसारच असतील असं सांगू शकत नाही त्यामुळे काहींना फरक पडतही असेल पण काहींना उलटा परिणाम जाणवू लागतो आणि शरीरात अधिक गंभीर त्रास सुरु होतात. त्यामुळे अशा पोस्ट पासून दूर रहा आणि आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. मुळव्याध हा आजार फक्त योग्य पथ्य पाळून सुद्धा समूळ नष्ट होऊ शकतो. पण ही पथ्य योग्यरीत्या पाळली गेली पाहिजेत. अशीच काही सर्वांना म्हणजे सर्व प्रकृतीच्या आणि सर्व वयाच्या रुग्णांना उपयोगी अशी सर्व साधारण पथ्यापथ्य मी आज सांगणार आहे.
■ मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पाळावयाची अपथ्ये (अपथ्य म्हणजे हे करू नये) ■
• अति मद्यपान, धूम्रपान आणि जड पाण्याचे सेवन करू नये.
• गुटखा, तंबाखू खाऊ नये.
• पचायला जड आणि जळजळ करणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये.
• अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन करू नये.
• गाय, डुक्कर, बकरी, कोंबडी इ. प्राण्यांचे मांस सेवन करू नये.
• अनुचित व्यायाम व अति मैथुन कर्म करू नये.
• दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये.
• कडक किंवा विषम आसनावर जास्त वेळ बसू नये.
• मल निस्सारण करताना कुंथू नये.
• भूक नसताना केवळ चमचमीत पदार्थाच्या ओढीने खाणे,पचनशक्ती कमी असताना तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, विशेषत: डाळी, गहू व मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये.
• चहा, कॉफी आणि चटकदार पदार्थाचे सेवन टाळावे.
■ मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पाळावयाची पथ्ये (पथ्य म्हणजे हे करावे) ■
• रात्री झोपताना कपभर कोमट पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून प्यावे.
• पेरू, पपई, केळे, काकडी इत्यादी फळे रात्रीच्या जेवणानंतर खाण्याची सवय ठेवावी.
• जेवण वेळेवर करावे.
• तांदूळ, यव, ज्वारी, मूग, दुधी, पालक, सुरण, कुळीथ, अंजीर, आवळा, नारळ, दूध, ताक, लोणी, तूप, धने, जिरे, लिंबू, हळद इत्यादी पदार्थ खावे.
• जेवताना रोज मुळा खा.
• आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाव्यात.
• आठवड्यातून २ वेळा Sitz Bath घ्यावे. (पसरट भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात १० मिनिटे बसावे.)
• सुरण वाफवून केलेली भाजी आणि ताक नियमित आहारात घ्यावे.
• नियमित योग्य व्यायाम करावा.
वरील ही सर्वसाधारण पथ्य पाळताना सुद्धा तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. कारण तुमच्या प्रकृतीनुसार यात बदल होऊ शकतो.
टीप – जरी कोणाला शस्त्रक्रिये द्वारे मुळव्याधापासून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी नोंदणीकृत डॉक्टरांच्याचं सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी. आणि क्षारसूत्रासारख्या आयुर्वेदीक उपचार पद्धतीचा वापर करायचा असेल तर नोंदणीकृत आयुर्वेदाचार्याकडूनच उपचार घ्यावा. आणि शस्त्रक्रिये नंतरही पथ्य पाळत राहावं कारण पथ्य न पाळल्यास हा आजार पुन्हा उद्भवू शकतो.
मित्रांनो आपले आरोग्य आपल्याच हातात असते, ते आपल्या हातातून जावू देऊ नका. पुढची धोक्याची घंटा वेळेत ऐका आणि योग्य पथ्य पाळून निरोगी रहा.
- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.
No comments:
Post a Comment